Ad will apear here
Next
आनेवाला पल...
...चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलावंत म्हणजे गुलज़ार. १८ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी वयाची ८६ वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘आनेवाला पल, जानेवाला है’ या गीताचा...
..........
किशोरकुमार यांच्या अंगी असलेल्या गायन, अभिनय, संगीत अशा विविध कलांमुळे त्यांचा उल्लेख करताना ‘सबकुछ किशोरकुमार’ असा शब्दप्रयोग केला जातो, असे मी किशोरकुमार यांच्याबद्दलच्या लेखात लिहिले होते. चार ऑगस्ट ही त्यांची जन्मतारीख! याच ऑगस्ट महिन्यात १८ तारखेला जन्मलेले चित्रपटसृष्टीतील आणखी एक व्यक्तिमत्त्व असेच अनेक कलांमध्ये निष्णात आहे. गीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक, संवादलेखक, कथालेखक आणि निर्माता अशा चित्रपट क्षेत्रातील विविध कलांमध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. दूरदर्शनचा जमाना सुरू झाल्यावर विविध मालिकांचे संवाद, गीते लिहिणारे व दिग्दर्शन करणारे, तसेच लहान मुलांकरिता गाणी, गोष्टींची पुस्तके लिहिणारे असे हे बहुढंगी, अनेक कलांत निपुण असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे गीतकार गुलज़ार होय!

१८ ऑगस्ट २०२० रोजी गुलज़ार यांनी वयाची ८६ वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या अफाट कर्तृत्वाचा आढावा या छोट्या लेखात घेण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ‘गागर (घागर) में सागर’ असाच प्रकार आहे; पण तरीही छोटासा प्रयत्न!

२००४मध्ये सरकारने ‘पद्मभूषण’ने सन्मानित केलेले गुलज़ार! कोशिश (१९७२), मौसम (१९७५), इजाजत (१९८८), लेकिन (१९९१) आणि माचिस (१९९६) अशा पाच चित्रपटांसाठी कधी निर्मिती, कधी निर्मिती, कधी पटकथा, कधी गीतलेखन याकरिता राष्ट्रीय पुरस्काराने पाच वेळा सन्मानित झालेले गुलज़ार! त्यांना दहा वेळा सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून, तसेच दिग्दर्शक, संवादलेखन व निर्माता अशा विविध कलांकारीता १९ वेळा फिल्मफेअर अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. २००२मध्ये त्यांना लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड प्रदान करून चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. २००८च्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गीतासाठी त्यांना ‘अॅकॅडमी अॅवॉर्ड फॉर बेस्ट ओरिजिनल साँग’ हा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता. याच गीतासाठी त्यांना २००९मध्ये ‘ग्रॅमी अॅवॉर्ड’ही देण्यात आला होता.

अशा प्रकारे सन्मानित केल्या गेलेल्या गुलज़ार यांचे मूळ नाव संपूर्णसिंह कालरा असे आहे. सध्या पाकिस्तानात असलेल्या दीना या छोट्या गावात १९३४मध्ये १८ ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म झाला होता. या दीना गावाच्या नावावरून त्यांनी सुरुवातीला गुलजार दीनवी या नावाने गीतलेखन केले होते; पण पुढे १९६३च्या सुमारास बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटासाठी त्यांनी जेव्हा गीत लिहिले, तेव्हा आपल्या नावाचे लघुरूप करून त्यांनी ‘गुलजार’ एवढेच नाव ठेवले. (गुलज़ार यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

फाळणीच्या वेळी आपल्या आई-वडिलांबरोबर ते दिल्लीला आले. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. पुढे ते मुंबईत आले. तेथे चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून नोकरी केली. काही काळ रंगाच्या एका दुकानातही नोकरी केली. लेखनाची सवय त्यांना बालपणापासून होती. एखादे दृश्य, एखाद्या माणसाचे वागणे, स्वभाव याची ते नोंद करून ठेवत. अनेक कविताही त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे मुंबईत आल्यावर ते प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन या संस्थेत सहभागी झाले.

सुरुवातीच्या काळात ते बिमल रॉय यांचे सहायक बनले. बिमल रॉय यांनी त्यांना ‘काबुलीवाला’ (१९६१) आणि ‘प्रेमपत्र’ (१९६२) या आपल्या चित्रपटांत गीते लिहिण्याची संधी दिली. ‘काबुलीवाला’मधील ‘गंगा आए कहाँ से..’ हे गीत खूप लोकप्रिय झाले. नंतर ‘बंदिनी’साठी त्यांनी गीते लिहिली. तो चित्रपट काबुलीवाला चित्रपटाच्या आधी प्रदर्शित झाल्यामुळे गुलजार यांचे पहिले गीत म्हणून ‘बंदिनी’चे गीतच ओळखले जाते.

नंतर त्यांनी हेमंतकुमार व हृषीकेश मुखर्जी यांच्याकडे ‘बीवी और मकान’ (१९६६) या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी सहदिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर मात्र त्यांनी पटकथा व संवादलेखनावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यातूनच ‘आशीर्वाद’ (१९६८), ‘आनंद’ (१९७०), ‘गुड्डी’ (१९७१) आणि ‘बावर्ची’ (१९७२) इत्यादी चित्रपट त्यांनी लिहले. आनंद, गुड्डी, खामोशी, आशीर्वाद इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गाणीही लिहिली. १९७१मध्ये ते निर्माता, दिग्दर्शकही बनले. कोशिश, परिचय, अचानक, आँधी, खुशबू, मौसम अशा अनेक सुंदर चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले. गुलजार यांची गीते एस. डी. बर्मन, हेमंतकुमार, सलील चौधरी, मदनमोहन आदी संगीतकारांनी संगीतबद्ध केली. परंतु त्यांची खरी कुंडली जमली आर. डी. बर्मन यांच्याबरोबर! या जोडीने अनेक अप्रतिम गीते दिली.

१९७२मध्ये ‘साउंड ऑफ म्युझिक’ या इंग्रजी चित्रपटावरून ‘परिचय’ हा हिंदी चित्रपट तयार करण्यात आला. त्यामध्ये गुलज़ार व आर. डी. बर्मन एकत्र आले. ‘परिचय’ची चारही गीते आशयसंपन्न व मधुर होती. त्यानंतर ‘आँधी’, ‘खुशबू’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘देवता’, ‘घर,’ ‘गोलमाल’, ‘मासूम’ अशा अनेक चित्रपटांमधून गुलज़ार आणि आर. डी. बर्मन यांनी रसिकांसाठी मधुर गीते दिली. वास्तविक पाहता ‘आरडी’ व्यावसायिक संगीत देऊन अन्य चित्रपटांतून ‘सुमार’ गीते देताना दिसून आले; पण गुलज़ार सोबतीला असतील, तेव्हा हेच ‘आरडी’ अशा अफलातून चाली व संगीत शोधून काढायचे, की ती गीते मनाला भुरळच घालायची व आजही विस्मरणात जात नाहीत.

आर. डी. बर्मन यांच्याव्यतिरिक्त संगीतकार ए. आर. रेहमान, विशाल भारद्वाज, हृदयनाथ मंगेशकर, शंकर-एहसान-लॉय या संगीतकारांनी दिलेल्या संगीतातूनसुद्धा गुलजार यांचे काव्य रसिकांपुढे आले.

गुलज़ार ‘तुम्हें जिंदगी के उजाले मुबारक’सारखे दर्दभरे गीत लिहितात व ‘बिडी जलाई ले’सारखे गाणेपण लिहितात. ‘हमने देखी है उन आँखों की...’सारखे प्रेमाचे महत्त्व व वेगळेपण दर्शवणारे काव्य लिहिणारे गुलज़ार ‘गोली मार भेजे में’ असे गीतही लिहिताना दिसतात. असे बरेच विरोधाभास आहेत. त्यामुळे अनेकदा असे वाटते, की गुलज़ार यांचे गीत म्हणजे एखाद्या ‘मॉडर्न पेंटिंग’सारखे आहे. त्या पेंटिंगची आकर्षक फ्रेम, मनमोहक रंग व सुखद देखणेपण आकर्षित करते; पण नीट निरखून ते चित्र पाहिले, तर ते समजण्यासाठी डोके खाजवावे लागते.

आजचे ‘सुनहरे गीत’ हे असेच आहे. त्यामधील मला भावलेला, समजलेला भावार्थ मी येथे देत आहे; पण न जाणो आणखी कोणाला त्यातून दुसराच अर्थ लक्षात येईल. हे गीत १९७९च्या ‘गोलमाल’ चित्रपटातील आहे. अमोल पालेकर व बिंदिया गोस्वामी त्याचे नायक-नायिका होते.

गुलजार यांचे हे गीत किशोरकुमार यांनी गायले आहे. आर. डी. बर्मन यांची मधुर चाल हे गीत गुणगुणायला प्रवृत्त करते. या गीतातून गुलज़ार सांगतात - 

हो सके तो इस में जिंदगी बिता दो 
पल जो ये जानेवाला है

येणारा क्षण हा निघून जाणारा आहे, शक्य असेल तर त्यातच जीवन व्यतीत करा. कारण हाही क्षण निघून जाणारा आहे. (मिळालेल्या क्षणाचा, वेळेचा विनियोग योग्य तऱ्हेने करा. कारण वेळ लगेच निघून जाणारी असते.)

आता या वेळेचा योग्य तऱ्हेने वापर करा म्हणजे कसा? यासाठी गुलज़ार सांगतात -

एक बार यूँ मिली मासूम सी कली 
खिलते हुए कहाँ खुशबाश मैं चली 
देखा तो यही है, ढूँढा तो नहीं है 
पल जो ये जानेवाला है...

एकदा एक निष्पाप कळी (मला) भेटली. उमलत उमलतच तिने (मला) सांगितले, की आनंदात राहा, खुशीत राहा. (मी पण खुशीतच राहिले, असे सांगून) ती चालती झाली, निघून गेली.)

जीवन कसे जगायचे हे या दोन ओळींत सांगून पुढील दोन ओळींत गुलजार सावधगिरीची सूचना देतात. ते म्हणतात, तुम्ही म्हणाल की, आहे वेळ माझ्याजवळ (पण क्षणात ती वेळ निघून जाते आणि नंतर) शोधूनही, हुडकूनही सापडत नाही, मिळत नाही. (कारण बाबांनो ती) वेळ, तो क्षण लगेच निघून जाणारा असतो. 
पुढच्या कडव्यात ते लिहितात -

एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं 
वहाँ दास्ताँ मिली लम्हा कहीं नही 
थोडासा हसा के, थोडासा रुला के 
पल ये भी जानेवाला है...

(मित्रांनो) एकदा काळाच्या प्रवाहातून एक क्षण घरंगळला, खाली पडला. (प्रेमाचा तो क्षण मला मिळाला, माझ्या जीवनात आला आणि नंतर मी) तो क्षण शोधायला गेलो, तर माझ्या हाती फक्त एक प्रेमकहाणी (की जी थोडीशी सुखद व जास्त दु:खदच होती) आली. थोडेसे सुख देऊन, थोडेसे दु:ख देऊन हाही क्षण जाणारच आहे. (नाही का?)

दोनच कडव्यांचे हे गीत जसे मधुर आहे, तसेच ते अधुरेही वाटते. काळ, वेळ, क्षण यावर भाष्य करणारे तत्त्वचिंतक गुलज़ार या गीतातून आपल्याला भेटतात. गोलमाल चित्रपटाचे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी होते. २७ ऑगस्ट २००६ ही त्यांच्या निधनाची तारीख. त्यांच्यासारखा कलावंत व गुलज़ार यांच्यासारखा प्रतिभावंत यांचे हे सुनहरे गीत. गुलज़ार यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. ‘ते असेच फुलत राहो,’ अशा त्यांना शुभेच्छा.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZMGBR
Similar Posts
किसका रस्ता देखे... अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले किशोरकुमार यांचा जन्मदिन चार ऑगस्ट रोजी होऊन गेला. त्यांनी गायलेल्या अनेक ‘सुनहऱ्या’ गीतांपैकी ‘सुनहरे गीत’ सदरात आज आपण आस्वाद घेऊ या ‘किसका रस्ता देखे...’ या गीताचा...
मेरा जीवन कोरा कागज़... अनेक चित्रपटांमधून अभिनयाचा वेगळा आविष्कार दाखवून एक काळ गाजविणाऱ्या अभिनेत्री म्हणजे जया भादुरी-बच्चन. नऊ एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. त्या औचित्याने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या त्यांचे अभिनयसामर्थ्य दाखविणारे ‘मेरा जीवन कोरा कागज़... ’ हे गीत...
जिंदगी के सफर में... अनेक हिंदी चित्रपट आपल्या उत्तम, श्रवणीय संगीताने बहारदार करणारे नामवंत संगीतकार म्हणजे आर. डी. बर्मन. चार जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘जिंदगी के सफर में...’ या त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याचा...
कभी खुद पे कभी हालात पे... ‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language